Wednesday, January 25, 2006

कालचा दिवस

कालपरवा -१८ ते -२० अंश सेल्सियसमध्ये रेंगाळणारे तापमान आज बरेच सुसह्य झालेय. काल सकाळी ८ च्या सुमारास घरातून निघून कार्यालयात पोहोचलो. मानेच्या वरील देहाचा भाग झाकलेला नसल्याने माझ्याच चेहऱ्याला हात लावला तरी कुणा दुसऱ्याच्या चेहऱ्याला स्पर्श केल्यासारखे वाटत होते ;) म्हणजे तसे काही नाही, स्पर्श झालेला हाताला जाणवत होता पण चेहऱ्याला जाणवत नव्हता.


तसे काल दिवसभर "Outside office hours" करायच्या एका महत्त्वाच्या कामशिवाय इतर नेहमीचेच होते. बरोबर ५ वाजता ती OOH चाचणी सुरू केली. कोणतेही महत्त्वाचे काम करताना सगळ्या गोष्टी मर्फीच्या नियमांनुसार वागतात याचा पुषकळदा अनुभव आलेला आहे. (मर्फीच्या नियमांवर माझी नितांत श्रद्धा आहे ) त्यामुळे शक्य तितकी पूर्वतयारी करूनही आणि विचारपूर्वक पावले उचलूनही आलेले अनाकलनीय आणि अगम्य अडथळे पार करत कसेबसे दिलेल्या खिडकीत (सर्विस विंडो) काम झाले. "संगणकही लहरी असतो आणि नेमक्या हातघाईच्या प्रसंगात आपली गोची करतो" असे वाटते मला कधीकधी. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का?


रात्री टीव्हीवर मि. डीड्स लागला होता. कहाणी तशी घिसिपिटी (हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीकडे) असली तरी पाहून मजा आली. डीड्स एका छोट्या शहरात पिझ्झेरिया चालवणारा आणि अधेमधे कविता करणारा एक साधा आणि सहृदयी माणूस. त्याला अचानक एका दिवंगत अंकलची ४० बिलियन डॉलरची मालमत्ता मिळते. तो मोठ्या शहरात येतो. बरेच संधीसाधू भेटतात. एक पत्रकार 'स्टोरी' मिळवण्यासाठी त्याच्या जवळ येते, पुढे (साहजिकच) त्याच्या प्रेमात पडते. पण तोपर्यंत त्याला नको ते कळाल्याने सगळी संपत्ती टाकून तो दूर जातो. शेवटी गैरसमज दूर, दुष्टांचा पराभव आणि शेवटी कथानायकाचा "पैसा म्हणजे सर्वस्व नाही. जास्त पैसा मिळवण्याच्या नादी न लागता, तुम्हाला जे करावे असे वाटते ते करा" असा संदेश असा अगदी टिपिकल मसाला होता. माझी आवडती Winona Ryder असल्याने असेल कदाचित पण बरा टाइमपास झाला. Adam Sandler चा भाबडा अभिनय कथेला साजेसा.


(चित्रांवर टिचकी मारल्यास मोठी चित्रे दिसतील.)

.

1 Comments:

At 8:59 PM, Blogger Tulip said...

विनोना रायडर मला पण खुप आवडते. espe. तिची little women मधली जो पाहून.
छान पोस्ट्स आहेत. स्वीडीश संध्याकाळ पण छान वाटली वाचून.

 

Post a Comment

<< Home