Thursday, January 26, 2006

एक स्वीडीश संध्याकाळ!

शीर्षक वाचून वाटेल की संध्याकाळ मी एका सोनेरी केसांच्या, गोऱ्यापान (भयंकर थंडीमुळे जराशी लालसर/गुलाबी छटा आलेल्या) एका सुंदर कन्येबरोबर घालवली की काय? नाही हो! तेवढे आमचे नशीब (अजून तरी) नाही ;) तर... त्याचे झाले असे की मी पडलो शाकाहारी प्राणी. तसे इथेही वेजिटेरिअन्स आणि फ्रुटेरिअन्स आहेत (फ्रुटेरिअन वरून Notting Hill मध्ये Hugh Grant ला 'दाखवायला आणलेली' फ्रुटेरिअन बया आठवली ;)) पण एकूणच माझ्या सहकाऱ्यांना शाकाहारी लोकांबद्दल कुतूहल आहे.

त्यातल्या एकाने एका संध्याकाळी मला जेवायला बोलावले. ऑफिसातून निघून थेट त्याच्या घरी धडकलो. त्याचे घर म्हणजे एक अजबखानाच आहे. गेल्यागेल्या कॉरीडॉरमध्ये एक भिंतभर उभे शोकेससारखे काही दिसले ('रॅक्स'... ज्यांनी डेटासेंटर्स मधल्या सर्वररूम्स पाहिल्या आहेत त्यांच्यासाठी) त्यात काही मोठे आणि आणि बरेच मध्यम आकाराचे संगणक (बटाटे नव्हे, "मध्यम आकाराचे" वगैरे अशी ओळख कांदेबटाट्याची देतात ;)), मॉनिटर्स. १, २ घडीचे संगणक (लॅपटॉप्स) आणि इतर बरेच हार्डवेअर पसरलेले होते. ते पार करून हॉल मध्ये गेलो. हॉल तसा प्रशस्त आणि टापटिप होता.

हा गडी खानसाम्याच्या वेषात, म्हणजे पोटाला कापड गुंडाळूनच होता. मी थेट त्याच्याबरोबर स्वयंपाकघरात शिरलो.
"शुड आय हेल्प यू इन समथिन?" मी विचारले.
"नो..न..न..न...न..नो यू आ माय गेस्ट टुडे!" असे तो मान हलवत आणि डोळे मोठे करत म्हणाला.
"ओके". मग मी त्याची पाककला पाहात, लागलेली आंग्ल गाणी ऐकत उभा राहिलो.
"वेट अ मिनिट! आय हॅव समथिंग फॉर यू!" असे म्हणून हॉलमध्ये गेला आणि "बुद्धा बार"ची चकती लावून आला.
"आय होप यू लाईक इट?"
"येआह! वेरी मच!" मी. खरंतर त्यातली बरीच मी ऐकलेली नव्हती.
"वॉट आ यू प्लॅनिंग टू प्रिपेर?" मी
"कूसकूस!" तो.

कूसकूस त्यावर ती भाज्यांची, क्रीम आणि मस्टर्डयुक्त ग्रेवी, पाव, बटर आणि संत्र्याचा रस..... छान जेवण झाले. जेवण झाल्यावर त्याने एक वेगळ्याच प्रकारचे चीज़ फ्रीज़मधून बाहेर काढले. त्यावर गडद काळसर हिरव्या रंगाचे डाग होते.
"कॅन यू गेस वॉट इज़ दिस?"
मला ते बुरशीसारखे वाटले "इट लुक्स लाइक सम काइंड ऑफ लिव्ज़"
"हाहाहा ... नो, इट्स फंगस!"
"फंगस?"
"येस, बिकॉज़ ऑफ फंगस इट टेस्ट्स डिफरंट, वी लाइक इट"
"ओह्ह!"
त्याने तोपर्यंत पारले मोनॅकोसारखी बिस्किटे काढली आणि त्यावर या चीज़चा एक स्लाईस ठेऊन माझ्या हातात दिला. चव आणि वास सुरुवातीला विचित्र वाटले खरे पण नंतर मजा वाटली.
"वुड यू लाइक टू हॅव अ कप ऑफ फ्रेश कॉफी?" तो
"येस, शुअर" मी
त्याच्या घरी एक कॉफी बनवायचे पारंपरिक यंत्र होते. त्याने कॉफीच्या बिया दळून त्यापासून दोन कप मस्त फेसाळलेली कॅफे लाट्टे तयार केली. कॉफी पिऊन हॉलमध्ये बसतोय तोवर हा पुन्हा स्वैपाकघरात पळाला. आता हा काय आणतो बरे असा विचार करत मी आपला त्याच्या सोफ्यावर आरामात हात पाय ताणून बसलो. थोड्या वेळाने साहेब पॉपकॉर्नने भरलेली छोटी बुट्टी आणि मगासचे चीज़ आणि बिस्किटे घेऊन आले.
"मूवी टाइम!!!" समोरच्या कपाटातून डिवीडी/सीडीजचा अल्बम काढून माझ्या हातात देत तो म्हणाला. " टेक आऊट वॉटेवर यू लाइक"
मी न पाहिलेला कोणता चित्रपट दिसतो ते पाहू लागलो. "कॉन्स्टंटाइन" दिसला, मी पाहिला नव्हता. नंतर पॉपकॉर्न आणि बिस्कीटे खात तो भुताखेतांचा चित्रपट पाहून रात्री जड अंत:करणाने आणि जड पोटाने त्याला "धन्यवाद" म्हणून निरोप घेतला.
.

3 Comments:

At 12:42 AM, Blogger Vishal K said...

"संध्याकाळ मी एका सोनेरी केसांच्या, गोऱ्यापान (भयंकर थंडीमुळे जराशी लालसर/गुलाबी छटा आलेल्या) एका सुंदर कन्येबरोबर घालवली की काय? नाही हो! तेवढे आमचे नशीब (अजून तरी) नाही"
बस काय शशांकराव, तुम्हीच असं म्हणू लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं?

छान आहे वर्णन. 'कूसकूस' वाचून एकदम खसखस आठवली. एकंदरीत स्वीडीश संध्याकाळ मजेत गेली म्हणायची.

 
At 5:58 AM, Anonymous Anonymous said...

छान... चालूद्या. बुरशी खाल्त्याने आपण मांसाहारी ठरत नसाल अशी आशा करतो ;)

बाकी नशीबाबद्दड, "खुदा मेहेरबान" होण्याची वाट पाहू नका. (जी फक्‍त गाढवेच पाहतात :D)
तो

 
At 6:26 AM, Blogger shashank said...

>> बस काय शशांकराव, तुम्हीच असं म्हणू लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं?

विशालराव, करा करा गरीबाची थट्टा. कॉलेजकन्यांच्या कुजबुजाटीमध्ये कोणाचे नाव असायचे आम्हांस ठाऊक नाही की काय? ;)

>> बुरशी खाल्त्याने आपण मांसाहारी ठरत नसाल अशी आशा करतो

हो हो. बरे झाले हे माझ्या नजरेस आणले. खरेखोटे पितळेबुवांना विचारायला हवे :)

 

Post a Comment

<< Home