Tuesday, February 28, 2006

विचार, कॉफी आणि समस्या

गेले काही आठवडे घाईगडबडीतच गेले. वेळेचे नियोजन करण्याचे कौशल्य कमी झालेय की काय असे वाटते. वेळेचे नियोजन असो किंवा इतर कोणतेही कौशल्य, वापर कमी झाला की त्याची धार कमी होते. कौशल्य मिळवणे आणि टिकवणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि सातत्य/चिकाटी हे प्रकार कधीच न जमल्याने, मी प्रक्रियेला नियंत्रित करण्याऐवजी प्रक्रिया मला नियंत्रित करत आली आहे :)

इथे "Great men (great women too) don't beleive in luck, they just beleive in cause and effect!" (महान लोक नशीबापेक्षा कार्यकारणावर विश्वास ठेवतात!) हे वाक्य आठवले. हे "ग्रेट लोक" काय काय करतात हे माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळे "आपण ग्रेट का नाही?" असा प्रश्न कधी पडत नाही :) थोडक्यात आपण नेहमी जमीनीवर राहतो शिवाय "ग्रेट लोक" जे काही करतात त्याचे थोडेफार अनुकरण केल्यानेही आपल्या बऱ्याचश्या अडचणी दूर होतात.

गेल्या आठवड्यात एकेदिवशी ऑफीसनंतर माझ्या सहकाऱ्याबरोबर कॉफीसाठी गेलो होतो. त्याला बौद्ध/हिंदू धर्म आणि एकूणच तत्त्वज्ञानामध्ये भलताच इंटरेस्ट आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान आणि ते आताच्या काळात कितपत लागू आहे यावर सुमारे तास दीड तास गहन चर्चा झाली :) या विषयात इंटरेस्ट असणारे आणि ते समजण्याइतपत बौद्धिक क्षमता असणारे कुणी भेटले की मजा येते.

एकंदर विचारप्रवर्तक, आव्हानात्मक थोडक्यात डोक्याला झिणझिण्या आणणारे असे काही ना काही वाचत/करत राहणे आवश्यक असते. महाविद्यालयीन जीवनात विशेषत: अभियांत्रिकीमध्ये (इतर क्षेत्रांचा अनुभव नसल्याने) अशी आव्हाने बरीच असतात. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर अश्या गोष्टींचा भरणाच आहे. खरोखर कल्पनाशक्तीला जास्तीतजास्त ताण द्यायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करावा :) पण आता अशी आव्हाने कमी झाल्याने बुद्धीला गंज चढू लागला आहे असे वाटते आहे.

"समस्या काय आहे हे समजणे ही समस्या सोडवण्याची पहिली पायरी असते" त्यामुळे समस्या सोडवण्याच्या एक पायरी जवळ मी आलेलो आहे. आता पुढची पायरी समस्या सोडवणे!

बघू कसे काय जमते.

Saturday, February 04, 2006

मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी


मराठी भाषेत लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, लिहू इच्छिणाऱ्या, वाचू इच्छिणाऱ्या सर्व ऑर्कुट्या मराठीजनांसाठी मराठी ब्लॉगर्स ही कम्युनिटी ऑर्कुट या संकेतस्थळावर सुरू केली आहे.

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=8346794 .

तर मित्रहो, या कम्युनिटीचा उद्देश जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत मराठी ब्लॉगची संकल्पना पोहोचवणे, कोणाला काही अडिअडचणी असतील (तांत्रिक) तर दूर करणे आणि अश्या तऱ्हेने वैश्विक जाळ्यावर मराठीचे अस्तित्व वाढवणे असे आहे.चला तर मग, करा सुरूवात.

शशांक

Thursday, February 02, 2006

काही गोष्टी काही धडे

जीवनात कन्फ्रंटेशन आणि कॉन्फ्लिक्ट्स यांना तोंड द्यावेच लागते हे जरी खरे असले तरी, कधीकधी यांना तोंड फोडावे पण लागते! बहुतेकांचा (माझाही) कल शक्यतो क्न्फ्रंटेशन टाळण्याकडे असतो. असे का?
  1. "समोरच्या व्यक्तीला वाइट वाटेल, त्यापेक्षा आपणच थोडी गैरसोय सहन करावी" असा विचार करून आपण बऱ्याचदा दुसऱ्याची चूक असूनही आणि आपल्यावर/इतरांवर अन्याय होत असतानाही आपण तोंड उघडत नाही.
  2. असे करण्याने समोरची व्यक्ती दुखावली जाईल. द्वेष, सूडभावना वाढेल आणि भविष्यात आपण अडचणीत असताना आपल्याला मदत मिळणार नाही.

हे जरी खरे असले तरी कन्फ्रंटेशनला पर्याय नाही. अन्यथा आपल्याला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या, आणि अन्यायकारक गोष्टी चुपचाप स्वीकारण्याची पाळी येते.

तेंव्हा "कन्फ्रंटेशन टाळू नये, शांतपणे आणि विचारपूर्वक त्याला सामोरे जावे!" (हा माझ्यासाठी धडा!)

असो ....

इथे येऊन एक वर्ष झाले. गेल्या वर्षात काय कमावले आणि काय गमावले याचा आढावा कधीतरी निवांत बसून घ्यावा असा विचार आहे. योग्य वाटल्यास त्याचा अहवाल ब्लॉगात येईलच.


कॉलेज सोडल्यापासून प्रत्येक फेब्रुवारी महिना नेहमी नाट्यमय घटना आणि स्थित्यंतरे घेऊन आला आहे. पण यंदा त्याची कृपादृष्टी दिसत नाही. कुणास ठाऊक? अजून, २६ दिवस आहेत. पाहू काय होते ते.

.