Sunday, April 30, 2006

सबसे तेज़!

"नमस्कार, मी कुमार शर्मा, सबसे तेज़ विशेष मध्ये तुमचे स्वागत आहे."
....
सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, बंदूकछाप कंदील, बिहारची रोशनी.
.....
"स्वागत आहे तुमचे सबसे तेज़ विशेषमध्ये. आजचा विषय आहे, "टॉमीचे काय झाले?". आजची सर्वात मोठी बातमी, अभिनेत्री निराशा बासूचा सर्वात जवळचा कुत्रा टॉमी काल रात्रीपासून बेपत्ता आहे. आज दिवसभर आम्ही आमच्या असंख्य वार्ताहरांकडून निराशा बासू, टॉमी, त्यांचे संबंध कसे होते, टॉमीच्या जीवावर कोण उठले असेल याबरोबरच निराशा बासूच्या चटपटीत ताज्या प्रेमप्रकरणाविषयी आमच्या दर्शकांना माहिती देणार आहोत. तुम्ही पाहत राहा सबसे तेज़."
.....
सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, डंडा लोखंडी सळया, आम्ही लावतो हातभार उत्तर प्रदेशच्या प्रगतीला.
.....
"पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे सबसे तेज़ विशेष मध्ये. "टॉमीचे काय झाले?" जी हॉं! आज भारतभर ज्याच्या त्याच्या तोंडी हाच प्रश्न आहे आणि भारतातील नं. १ वाहिनीशिवाय ह्या प्रकरणाची संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे मिळेल? चला तर मग पहिल्यांदा बोलू आमचे मुंबईचे वार्ताहर धर्मेश तिवारीशी.
धर्मेशजी, काल रात्रीपासून तुम्ही निराशा बासूच्या घरासमोर तळ देऊन आहात. काय नवी माहिती आहे तुमच्याकडे?"
"जी कुमारजी, जसे तुम्हाला माहीत आहे, काल निराशा बासूच्या नोकराने, टॉमी हरवल्याची बातमी जुहू पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. निराशा बासूने याविषयी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही तरी आम़चा अंदाज आहे की त्या खूप दु:खी आहेत. कुमार."
"धर्मेशजी, आज सकाळपासून कोण कोण तेथे येऊन गेले? फिल्म इंडस्ट्रीतील कोणी आले होते का? मोठे पोलीस अधिकारी, राजकीय नेते यापैकी कोणी आले होते का?"
"कुमारजी, अजूनपर्यंत तरी जुहू पोलीस ठाण्याचा हवालदार वगळता कोणीही आलेले नाही. पण बरीच मोठमोठी माणसे येतील असा आमचा अंदाज आहे. कुमार."
"धन्यवाद धर्मेशजी, तुम्ही तिथेच तळ ठोकून राहा. (कॅमेऱ्याकडे पाहून) पाहिलंत तुम्ही पोलीस आणि शासन, कायदा-सुव्यवस्थेविषयी किती उदासीन आहे ते. आता आमचे मुंबईचे दुसरे वार्ताहर कुणाल श्रीवास्तव यांच्याशी बोलू. "नमस्कार कुणालजी , तुम्ही आता कुठे आहात आणि काय नवी माहिती आहे तुमच्याकडे?"
"नमस्कार कुमारजी, मी आता निराशाच्या घरापासून जवळच असलेल्या एका पानपट्टीवर उभा आहे. ही पानपट्टी त्याच रस्त्यावर आहे जिथे टॉमी रोज फिरायला येत असे. आणि या समोरच्या खांबावरच ... "
"ठीक आहे, ठीक आहे! तुमचे त्या पानपट्टीवाल्याशी काही बोलणे झाले का? त्याचे या विषयावर काय मत आहे."
"जी, कुमारजी, पानपट्टीवाल्या जमुनाप्रसाद चौरसियाशी आणि त्याच्या ग्राहकांशी आम्ही थोड्या वेळापूर्वीच बोललो. मुंबईतील कायदा-सुव्यवस्था स्थिती चांगली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय या गल्लीत टॉमीचे काही हितशत्रू होते असे आम्हाला समजले आहे. फक्त गल्लीतील सौमित्रो मुखर्जींच्या ल्युसीशी टॉमीचे पटत होते अशीही माहिती आम्हाला मिळाली आहे. कुमार."
"कुणालजी, तुमचे ल्युसीशी... म्हणजे, मुखर्जींशी बोलणे झाले का?"
"जी कुमारजी, आम्ही मुखर्जीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या नोकराच्या म्हणण्यानुसार ल्युसीच्या वागणुकीत काहीच फरक दिसून आलेला नाही आहे. पण आपल्या दर्शकांसाठी ल्युसीचे छायाचित्र आम्ही मिळवले आहे. कुमार."
"कुणालजी या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही तिथेच राहून सबसे तेज़ माहिती देत राहा. (प्रेक्षकांना उद्देशून) हे होते आमचे वार्ताहर कुणाल श्रीवास्तव, टॉमी प्रकरणात ल्युसीच्या रूपाने हा नवीनच धागादोरा मिळाला आहे. तुम्ही ल्युसीची छायाचित्रे एक्स्क्लुसिवली आमच्या वाहिनीवरच पाहू शकता. आम्ही यावर कायम नज़र ठेवून आहोत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पाहूया आमचे कोलकात्याचे वार्ताहर काय बातमी देतात.
......
सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, उंट छाप मसाले, चव राजस्थानची.
......
आता जाऊया आमचे कोलकात्याचे वार्ताहर अमृतांशूकडे. अमृतांशूजी काय माहिती आहे तुमच्याकडे?"
"जी कुमारजी, आता माझ्याबरोबर आहेत सुचिस्मितादेवी, ज्या निराशा बासू च्या आईच्या शाळेत होत्या. (सुचिस्मिताबाईंकडे बघून) सुचिस्मिताजी तुम्ही निराशाच्या आईला कसे ओळखता?"
"आम्ही पहिली पासून चौथीपर्यंत कोलकात्यातील शाळेत एकाच वर्गात होतो. "
"तर मग या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? अं... म्हणजे निराशा बासूचा प्राणप्रिय कुत्रा टॉमी हरवला आहे त्याबद्दल"
"वाईट झालं"
"(कॅमेऱ्याकडे पाहून) जी कुमारजी, सुचिस्मितादेवींना या गोष्टीबद्दल अतिशय दु:ख झालेले आहे. शिवाय निराशाची आई इथे शिकत असताना तिचे शैक्षणिक करियर कसे होते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
"अमृतांशूजी या माहितीसाठी धन्यवाद. (प्रेक्षकांना उद्देशून) तर हे होते आमचे वार्ताहर अमृतांशू. या बातमीशी संबंधित प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची माहिती आणि निराशाच्या जवळच्या माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत."
......
सबसे तेज़ विशेषचे प्रायोजक आहेत, चारमिनार बल्ब्स, आम्ही लावतो आंध्राचे दिवे भारतभर.
......
नमस्कार, आपले पुन्हा स्वागत आहे सबसे तेज़ विशेष मध्ये. आता या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांना आमच्या स्टुडिओत बोलावले आहे. हे आहेत प्रख्यात जनावरांचे डॉक्टर डॉ. धनपाल यादव आणि हे आहेत प्रसिद्ध फिल्मी पत्रकार इस्माईल जानवरवाला. आपले स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. धनपालजी तुम्ही जनावरांचे तज्ज्ञ आहात, टॉमीच्या मनात बेपत्ता होण्याआधी काय विचार असतील किंवा त्याची मानसिक स्थिती कशी असेल असे तुम्हाला वाटते?"
"अंऽऽ... टॉमीचे नक्की काय झाले हे कळल्याशिवाय काही सांगता येणार नाही."
"इस्माईलजी आपले काय मत आहे? निराशाच्या वागणुकीशी किंवा तिच्या प्रेमप्रकरणांशी याचा काही संबंध आहे का?"
"शक्यता आहे. संगतीचा परिणाम होऊ शकतो पण नक्की सांगता येणार नाही."
"(दर्शकांकडे पाहून) हे होते आमचे तज्ज्ञ पॅनेल जे प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती देतात. दर्शकांसाठी आम्ही एक जनमत चाचणी घेत आहोत. मुंबईची कायदा-सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे असे तुम्हाला वाटते का? आपली उत्तरे तुम्ही आम्हाला ४२० या नंबरवर पाठवू शकता. तुम्ही पाहत आहात भारताची नं. १ वृत्तवाहिनी, सबसे तेज़. प्रेक्षकांना आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की आज रात्री ९ वाजता आमचा विशेष कार्यक्रम आहे "अघोरी", त्यात आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यातील मांत्रिकांविषयी माहिती देणार आहोत. त्यात आम्ही दिल्लीतील प्रसिद्ध मांत्रिक आणि अनेक राजकीय नेत्यांचे गुरू बुद्धूस्वामी यांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले आहे. तुम्हाला मंत्रतंत्राविषयी काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यानंतर १० वाजता आमचा लोकप्रिय कार्यक्रम "गुन्हेगार" ज्यात आम्ही खून, चोरी, बलात्कार यांची रसभरित आणि विस्तृत वर्णन करतो. तर पाहत राहा सबसे तेज़!"
......

क्षुद्र स्वार्थासाठी असंबद्ध, चुकीची आणि अतिरंजित माहिती प्रसारित करणाऱ्या दर्जाहीन, विवेकशून्य, आक्रस्ताळ्या हिंदी वाहिन्या आणि त्या आवडीने पाहणाऱ्या प्रेक्षकांना अनादरपूर्वक समर्पित.

Monday, April 24, 2006

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - छायाचित्रे

नुकताच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा योग आला. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच प्राचीन आणि सुंदर शिल्पकलेचा नमुना म्हणून महालक्ष्मी मंदिराचे महत्त्व आहे. हे मंदिर बऱ्याच मोठ्या जागेत वसलेले असून मंदिराची वास्तूही मोठी आहे. सभामंडप, गाभारा, आतील प्रदक्षिणामार्ग आणि अनेक स्तंभ कोरीवकामाने नटलेले आहेत. मंदिराला बाहेरूनही प्रदक्षिणा करता येते. मंदिराच्या आत आणि बाहेर इतर अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत.

मंदिराविषयी अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
श्रीकरवीरनिवासिनी.कॉम
कोल्हापूरवर्ल्ड.कॉम

सकाळच्या वेळी काढलेली काही छायाचित्रे.

चित्रांवर टिचकी मारली असता नव्या खिडकीत मोठी चित्रे दिसतील. (इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर, इंटरनेट एक्स्प्लोरर चित्र लहान करून दाखवतो, चित्र मोठे दिसण्यासाठी चित्रावर माऊसचे टोक नेताच चित्राच्या खालच्या उजवीकडील कोपऱ्यात असे चित्र दिसेल, त्यावर टिचकी मारा.)










































दीपमाळा







आवारातील वड आणि पिंपळ