Tuesday, November 09, 2010

उपक्रम दिवाळी अंक २०१०

उपक्रम दिवाळी अंक २०१० प्रकाशित झाला आहे. http://diwali.upakram.org इथे पाहा.


< >

Thursday, October 30, 2008

उपक्रम दिवाळी अंक - ऑनलाइन मराठी दिवाळी अंक

महाराष्ट्रात दिवाळी अंकाची देदिप्यमान परंपरा आहे. फराळ, फटाके, नवे कपडे याबरोबरच दिवाळी अंक वाचणे हे दिवाळीचे एक प्रमुख आकर्षण असते.

छापील दिवाळी अंकाच्या बरोबरीने आता ऑनलाइन दिवाळी अंकही उपलब्ध होऊ लागले आहेत. माहितीप्रधान लेख, चर्चा आणि समुदाय ही वैशिष्ट्ये असलेल्या उपक्रम या संकेतस्थळाचा पहिला दिवाळी अंक यावर्षी प्रकाशित झाला आहे. उपक्रमाची अभ्यासपूर्ण, माहितीप्रधान लेखन, विषयांचे वैविध्य आणि माहितीपूर्ण प्रतिसाद ही वैशिष्ट्ये या दिवाळी अंकामध्येही जाणवतात. भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, ज्योतिष, इतिहास, प्रवास या विविध विषयांनी हा अंक सजलेला आहे. याबरोबरच तर्कक्रीडा, कोडी, उपक्रमावरील छायाचित्रण समुदायाच्या सदस्यांची निवडक छायाचित्रेही आहेत.
Monday, June 19, 2006

मी काय वाचतो? का वाचतो?

वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ॥

या ज्ञानोबामाऊलीच्या पसायदानात किरकोळ बदल करून मी माझी आधुनिक प्रार्थना बनवली आहे.

वाचत सकळ मंडळी । पुस्तकनिष्ठांची मांदियाळी । अनवरत जालांतरी । भेटतु या भूता ॥

तर असे हे सगळे पुस्तकनिष्ठ, जे निरंतर वाचत असतात, ते माहितीच्या महाजालावर या भुताला नेहमी भेटत राहोत. (मूळ ओवीत "भूतां" मधील "ता" वर असणारा अनुस्वार नव्या प्रार्थनेत नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे ते एकवचनी भुताला, म्हणजे मला किंवा प्रार्थना म्हणणाऱ्याला, उद्देशून आहे.)

पुस्तकनिष्ठांच्या मांदियाळीत माझी जागा कोणती हे ओळखण्यास फार विचार करावा लागला नाही. पंढरीच्या वारीमध्ये संतसज्जनांच्या मांदियाळीत, पालखी उचलणारे, तुळशी-वृंदावन गळ्यात घेतलेले, पेटी, मृदंग, टाळ आणि इतर नित्योपयोगी सामान वाहणारे लोक लागतात. सांप्रदायिक भजनांमध्ये गायक, तबलजी, पेटीमास्तर यांच्याबरोबर टाळ वाजवणारे आणि आवाजात आवाज मिसळणारे लोक लागतात. संतसज्जनांच्या आणि कलावंताच्या आशीर्वादाने जे मिळेल ते चांगलेच अश्या भावनेने हे लोक चालत असतात. पुस्तकनिष्ठांच्या मांदियाळीत अशी भूमिका करायला मी आणि माझ्यासारखे आनंदाने तयार होतील.

मला वाचनाची आवड आहे पण मी फार काही चांगले, खोल, अर्थपूर्ण वाचले आहे असे नाही. कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्रे मी फारशी वाचलेली नाहीत. बऱ्याच नावाजलेल्या साहित्यिकांची नावेही मला माहीत नाहीत. ज्यांची नावे माहीत आहेत त्यांची पुस्तके मी वाचलेली नाहीत. (आग्रहाखातर काही प्रसिद्ध पुस्तके वाचल्यावर "यात विशेष काय आहे?" असे भाबडे प्रश्न मला पडतात, पण त्या पुस्तकांनी भारावलेल्या लोकांना ते प्रश्न विचारण्याचे धाडस होत नाही.) हे मी अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतो आहे. "मला या विषयाची फारशी माहिती नाही" किंवा "मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही" अशी सुरूवात करून त्याच विषयावर पुढे तासनतास बोलणाऱ्या किंवा भलेमोठे लेख/पुस्तके लिहिणाऱ्या महान लोकांसारखा कोणताही आव मला आणायचा नाही.

मी काय वाचतो? आणि का वाचतो? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना खरेच बराच विचार करावा लागला. लहानपणी वाचनाचे "विरंगुळा" हे एक (आणि एकच) कारण होते. सिंहासन बत्तिशी, वेताळ पंचविशी, पंचतंत्र, इसापनीती वगैरे वगैरे त्यावेळची आवडती पुस्तके होती, एकच पुस्तक कितीवेळा वाचावे याचा विचार फारसा केला जात नसे. बोध, तात्पर्य, शिकवण वगैरे काही असते/असावे हे आमच्या खिजगणतीतही नसायचे. पण अजाणतेपणी का होईना पण त्या पुस्तकांनी बालमनावर केलेला परिणाम अजूनही शिल्लक आहे. ("म्हणजे? त्यानंतर तुझी मानसिक वाढ झालीच नाही की काय?" असे कुणाला वाटले तर त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे असे मला वाटते.)

माझे बालपण जिथे गेले, तिथल्या एकमेव दुकानात शाळेची पुस्तके वगळता २०/३० पानी बालकथांशिवाय इतर काही मिळत नसे. "शाळेला लायब्ररी आहे" हे वाक्य "गाईला चार पाय असतात" किंवा "सूर्य पूर्वेला उगवतो" या वाक्यांइतकेच बिनमहत्त्वाचे होते. शिवाय अभ्यासाची पुस्तके किंवा रोजचे वर्तमानपत्र वाचण्याचा देखील कंटाळा असलेल्या मित्रमंडळामुळे लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणे हे स्वप्नातदेखील येत नव्हते. त्यामुळे घरात आधीचीच असलेली आणि भेट म्हणून मिळालेली पुस्तके ह्यावरच आमची गुजराण चालत असे.

कालांतराने या नेहमीच्या पुस्तकांमध्ये अरेबिअन नाइट्स, सिंदबादच्या सफरी, रॉबिन हूड, रॉबिन्सन क्रुसो, फास्टर फेणे, शेरलॉक होम्स, "रशियन लोककथा" नावाचे एक भलेमोठे, लाल कापडी बांधणीतले पुस्तक अशी भर पडली. पुढे चिं. वि. जोशी आणि पुलं आयुष्यात आले आणि अजूनही गेले नाहीत. जातील असे वाटत नाही किंवा त्यांनी जावे असेही वाटत नाही.

आमच्या घरात खूप पुस्तके आहेत. त्यातली बहुसंख्य आध्यात्मिक, तत्त्वज्ञानविषयक आहेत. गीताप्रेस गोरखपूर आणि रामकृष्ण मिशनची पुस्तके, रामायण, महाभारताचे खंड, तुकाराम गाथा, अनेक संतचरित्रे अशी बरीच मोठी यादी होईल. समज वाढली तशी यातली काही पुस्तके वाचली.

पुढे तांत्रिक विषयांवरची पुस्तके वाचावी लागली. त्या पुस्तकांनी माझ्या मनावर, बुद्धीवर आणि एकूण विचारप्रक्रियेवर, वागणुकीवर बराच प्रभाव टाकला आहे. ("हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे" हे वापरून वापरून गुळगुळीत झालेले वाक्य इथे (नेहमीप्रमाणे) चपखल बसते.)

असो, नमनालाच धडाभर तेल गेल्याने आता पुस्तकनिष्ठांची मांदियाळी या खेळाच्या नियमाप्रमाणे लिहितो. (हा खेळ सुरू होण्याच्या बऱ्याच आधी मंदारने मला टॅग केले होते त्यावेळी मी काही लिहिले नाही, त्यामुळे हे लिहिताना एक अपराधीपणाची जाणीव आहे (लिहायला काय जातेय?) )

सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक

मी येताना आणलेली तीन(च) मराठी पुस्तके मी गेले दीड वर्ष पुन: पुन्हा वाचतो आहे. ही तीनही पुस्तके आळीपाळीने किंवा एकत्रच माझ्या वाचनात असतात.

 1. व्यक्ती आणि वल्ली
 2. गोळाबेरीज
 3. हसवणूक

"लेखक कोण?" आणि "या पुस्तकांविषयी थोडेसे" हे सांगण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही :)

"द डेलिकेट स्टॉर्म" हे शेवटचे वाचलेले इंग्रजी पुस्तक.

आवडणारी/प्रभाव पाडणारी पुस्तके

  1. ज्ञानयोग - स्वामी विवेकानंद, मराठी अनुवादकाचे नाव आठवत नाही आणि सध्या ते पुस्तक माझ्याकडे नाही. स्वामी विवेकानंदांचे सगळ्या लिखाणाचे आणि भाषणांचे दुवे इथे मिळतील.
  2. राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
  3. पुलंची मी वाचलेली सगळी पुस्तके
  4. चिं वि जोशींची मी वाचलेली सगळी पुस्तके


   अद्याप वाचायची आहेत अशी पुस्तके

   पुस्तकनिष्ठ मराठी अनुदिनीकारांच्या नोंदी वाचून त्यातली ९९.९९‍% पुस्तके वाचली नाहीत ह्याचा साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे "अद्याप वाचावयाच्या पुस्तकांची" यादी मारूतीच्या शेपटीप्रमाणे, भारताच्या मतदार यादीप्रमाणे, राजकीय पक्षांच्या आश्वासन यादीप्रमाणे, माझ्याविषयी मित्रमैत्रिणींना असणाऱ्या तक्रारींच्या यादीप्रमाणे बरीच लांबलचक होईल म्हणून ती देण्याचा प्रयत्न करत नाही.

   एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे

   बऱ्याच मुली वेगवेगळ्या कारणांनी आवडत असल्या तरी एकाच मुलीशी लग्न करता येईल हे जाणवल्यावर मनुष्य जसा खिन्न होईल तशी खिन्नता मला आता आली आहे. असो आता निवड करायचीच आहे तर सगळ्यांची गोळाबेरीज करून "गोळाबेरीज" ची निवड करावी लागेल. गोळाबेरीज हे पुलंच्या पुस्तकांपैकी माझे विशेष आवडते पुस्तक आहे. ग्रामीण जीवानाचे अविभाज्य अंग असलेली पण पुलंच्या कृपेने शहरातील सुशिक्षित लोकांच्या दिवाणखान्यातही दिमाखाने नांदणारी "म्हैस" याच पुस्तकातली. "घरमालकास मानपत्र", "बंधू आणि भगिनींनो", "सरदी" मधील निखळ विनोद, "माजघरातला स्फिंक्स", "घरगुती भांडणे", "जाल्मिकीचे लोकरामायण" मधील तिरकस विनोद. "मी नाही विसरलो", "एका दिवंगत गंधाचा मागोवा" मधील आठवणीत रमणारा विनोद आणि विशेष आवडणारे "एक नवे सौंदर्यवाचक विधान", "महाभारतकालीन वर्तमानपत्रे" आणि "माझी कु. संपादकीय कारकीर्द". एकूण काय? तर संग्रही असावेच असे हे पुस्तक.

   मी या खेळासाठी निवडलेले अनुदिनीकार

   1. चित्तरंजन
   2. अमित
   3. प्रशांत
   4. रत्नदीप (रत्नदीप, बरेच दिवस तुझ्या ब्लॉगवर नवी नोंद नाही म्हणून... :))
   5. मंदार (history repeats itself, but not in the same order - shashank joshi :) )
   6. अभिजीत (अभ्या या निमित्ताने तू मराठी ब्लॉग सुरू करशील.)


   टॅग करून हे लिहिण्याची प्रेरणा दिल्याबद्दल ट्युलिपचे आभार.

   Friday, June 09, 2006

   शिवकल्याण राजा


   "शिवकल्याण राजा" नावाची ध्वनिफीत संग्रही ठेवावी अशी आहे. हृदयनाथांचे संगीत, लतादीदींचा आवाज, बाबासाहेब पुरंदऱ्यांचे निवेदन आणि एकाहून एक प्रेरणादायक गीते असा सुयोग. संग्रही नसली तरी जालावर ऐकता येईल.

   भाग १ -

   • प्राणिमात्र झाले दुःखी

   • जय जय शिवराया (शब्द)

   • नीज रे शिवराया

   • हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा (शब्द)

   • सरणार कधी रण (शब्द)

   • कुंद कहां

   भाग २ -

   • वेडात मराठे वीर दौडले सात (शब्द)

   • आनंद वनभुवनी (शब्द)

   • इंद्रजिमि जंभपर

   • अरुणोदय झाला

   • निश्चयाचा महामेरू (शब्द)

   राजाशिवाजी.कॉम ह्या संकेतस्थळावर नजर ठेवावी.

   शशांक

   .

   Sunday, April 30, 2006

   सबसे तेज़!

   "नमस्कार, मी कुमार शर्मा, सबसे तेज़ विशेष मध्ये तुमचे स्वागत आहे."
   ....
   सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, बंदूकछाप कंदील, बिहारची रोशनी.
   .....
   "स्वागत आहे तुमचे सबसे तेज़ विशेषमध्ये. आजचा विषय आहे, "टॉमीचे काय झाले?". आजची सर्वात मोठी बातमी, अभिनेत्री निराशा बासूचा सर्वात जवळचा कुत्रा टॉमी काल रात्रीपासून बेपत्ता आहे. आज दिवसभर आम्ही आमच्या असंख्य वार्ताहरांकडून निराशा बासू, टॉमी, त्यांचे संबंध कसे होते, टॉमीच्या जीवावर कोण उठले असेल याबरोबरच निराशा बासूच्या चटपटीत ताज्या प्रेमप्रकरणाविषयी आमच्या दर्शकांना माहिती देणार आहोत. तुम्ही पाहत राहा सबसे तेज़."
   .....
   सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, डंडा लोखंडी सळया, आम्ही लावतो हातभार उत्तर प्रदेशच्या प्रगतीला.
   .....
   "पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे सबसे तेज़ विशेष मध्ये. "टॉमीचे काय झाले?" जी हॉं! आज भारतभर ज्याच्या त्याच्या तोंडी हाच प्रश्न आहे आणि भारतातील नं. १ वाहिनीशिवाय ह्या प्रकरणाची संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे मिळेल? चला तर मग पहिल्यांदा बोलू आमचे मुंबईचे वार्ताहर धर्मेश तिवारीशी.
   धर्मेशजी, काल रात्रीपासून तुम्ही निराशा बासूच्या घरासमोर तळ देऊन आहात. काय नवी माहिती आहे तुमच्याकडे?"
   "जी कुमारजी, जसे तुम्हाला माहीत आहे, काल निराशा बासूच्या नोकराने, टॉमी हरवल्याची बातमी जुहू पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. निराशा बासूने याविषयी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही तरी आम़चा अंदाज आहे की त्या खूप दु:खी आहेत. कुमार."
   "धर्मेशजी, आज सकाळपासून कोण कोण तेथे येऊन गेले? फिल्म इंडस्ट्रीतील कोणी आले होते का? मोठे पोलीस अधिकारी, राजकीय नेते यापैकी कोणी आले होते का?"
   "कुमारजी, अजूनपर्यंत तरी जुहू पोलीस ठाण्याचा हवालदार वगळता कोणीही आलेले नाही. पण बरीच मोठमोठी माणसे येतील असा आमचा अंदाज आहे. कुमार."
   "धन्यवाद धर्मेशजी, तुम्ही तिथेच तळ ठोकून राहा. (कॅमेऱ्याकडे पाहून) पाहिलंत तुम्ही पोलीस आणि शासन, कायदा-सुव्यवस्थेविषयी किती उदासीन आहे ते. आता आमचे मुंबईचे दुसरे वार्ताहर कुणाल श्रीवास्तव यांच्याशी बोलू. "नमस्कार कुणालजी , तुम्ही आता कुठे आहात आणि काय नवी माहिती आहे तुमच्याकडे?"
   "नमस्कार कुमारजी, मी आता निराशाच्या घरापासून जवळच असलेल्या एका पानपट्टीवर उभा आहे. ही पानपट्टी त्याच रस्त्यावर आहे जिथे टॉमी रोज फिरायला येत असे. आणि या समोरच्या खांबावरच ... "
   "ठीक आहे, ठीक आहे! तुमचे त्या पानपट्टीवाल्याशी काही बोलणे झाले का? त्याचे या विषयावर काय मत आहे."
   "जी, कुमारजी, पानपट्टीवाल्या जमुनाप्रसाद चौरसियाशी आणि त्याच्या ग्राहकांशी आम्ही थोड्या वेळापूर्वीच बोललो. मुंबईतील कायदा-सुव्यवस्था स्थिती चांगली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय या गल्लीत टॉमीचे काही हितशत्रू होते असे आम्हाला समजले आहे. फक्त गल्लीतील सौमित्रो मुखर्जींच्या ल्युसीशी टॉमीचे पटत होते अशीही माहिती आम्हाला मिळाली आहे. कुमार."
   "कुणालजी, तुमचे ल्युसीशी... म्हणजे, मुखर्जींशी बोलणे झाले का?"
   "जी कुमारजी, आम्ही मुखर्जीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या नोकराच्या म्हणण्यानुसार ल्युसीच्या वागणुकीत काहीच फरक दिसून आलेला नाही आहे. पण आपल्या दर्शकांसाठी ल्युसीचे छायाचित्र आम्ही मिळवले आहे. कुमार."
   "कुणालजी या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही तिथेच राहून सबसे तेज़ माहिती देत राहा. (प्रेक्षकांना उद्देशून) हे होते आमचे वार्ताहर कुणाल श्रीवास्तव, टॉमी प्रकरणात ल्युसीच्या रूपाने हा नवीनच धागादोरा मिळाला आहे. तुम्ही ल्युसीची छायाचित्रे एक्स्क्लुसिवली आमच्या वाहिनीवरच पाहू शकता. आम्ही यावर कायम नज़र ठेवून आहोत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पाहूया आमचे कोलकात्याचे वार्ताहर काय बातमी देतात.
   ......
   सबसे तेज विशेषचे प्रायोजक आहेत, उंट छाप मसाले, चव राजस्थानची.
   ......
   आता जाऊया आमचे कोलकात्याचे वार्ताहर अमृतांशूकडे. अमृतांशूजी काय माहिती आहे तुमच्याकडे?"
   "जी कुमारजी, आता माझ्याबरोबर आहेत सुचिस्मितादेवी, ज्या निराशा बासू च्या आईच्या शाळेत होत्या. (सुचिस्मिताबाईंकडे बघून) सुचिस्मिताजी तुम्ही निराशाच्या आईला कसे ओळखता?"
   "आम्ही पहिली पासून चौथीपर्यंत कोलकात्यातील शाळेत एकाच वर्गात होतो. "
   "तर मग या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? अं... म्हणजे निराशा बासूचा प्राणप्रिय कुत्रा टॉमी हरवला आहे त्याबद्दल"
   "वाईट झालं"
   "(कॅमेऱ्याकडे पाहून) जी कुमारजी, सुचिस्मितादेवींना या गोष्टीबद्दल अतिशय दु:ख झालेले आहे. शिवाय निराशाची आई इथे शिकत असताना तिचे शैक्षणिक करियर कसे होते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
   "अमृतांशूजी या माहितीसाठी धन्यवाद. (प्रेक्षकांना उद्देशून) तर हे होते आमचे वार्ताहर अमृतांशू. या बातमीशी संबंधित प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची माहिती आणि निराशाच्या जवळच्या माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत."
   ......
   सबसे तेज़ विशेषचे प्रायोजक आहेत, चारमिनार बल्ब्स, आम्ही लावतो आंध्राचे दिवे भारतभर.
   ......
   नमस्कार, आपले पुन्हा स्वागत आहे सबसे तेज़ विशेष मध्ये. आता या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांना आमच्या स्टुडिओत बोलावले आहे. हे आहेत प्रख्यात जनावरांचे डॉक्टर डॉ. धनपाल यादव आणि हे आहेत प्रसिद्ध फिल्मी पत्रकार इस्माईल जानवरवाला. आपले स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. धनपालजी तुम्ही जनावरांचे तज्ज्ञ आहात, टॉमीच्या मनात बेपत्ता होण्याआधी काय विचार असतील किंवा त्याची मानसिक स्थिती कशी असेल असे तुम्हाला वाटते?"
   "अंऽऽ... टॉमीचे नक्की काय झाले हे कळल्याशिवाय काही सांगता येणार नाही."
   "इस्माईलजी आपले काय मत आहे? निराशाच्या वागणुकीशी किंवा तिच्या प्रेमप्रकरणांशी याचा काही संबंध आहे का?"
   "शक्यता आहे. संगतीचा परिणाम होऊ शकतो पण नक्की सांगता येणार नाही."
   "(दर्शकांकडे पाहून) हे होते आमचे तज्ज्ञ पॅनेल जे प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती देतात. दर्शकांसाठी आम्ही एक जनमत चाचणी घेत आहोत. मुंबईची कायदा-सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे असे तुम्हाला वाटते का? आपली उत्तरे तुम्ही आम्हाला ४२० या नंबरवर पाठवू शकता. तुम्ही पाहत आहात भारताची नं. १ वृत्तवाहिनी, सबसे तेज़. प्रेक्षकांना आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की आज रात्री ९ वाजता आमचा विशेष कार्यक्रम आहे "अघोरी", त्यात आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यातील मांत्रिकांविषयी माहिती देणार आहोत. त्यात आम्ही दिल्लीतील प्रसिद्ध मांत्रिक आणि अनेक राजकीय नेत्यांचे गुरू बुद्धूस्वामी यांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले आहे. तुम्हाला मंत्रतंत्राविषयी काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यानंतर १० वाजता आमचा लोकप्रिय कार्यक्रम "गुन्हेगार" ज्यात आम्ही खून, चोरी, बलात्कार यांची रसभरित आणि विस्तृत वर्णन करतो. तर पाहत राहा सबसे तेज़!"
   ......

   क्षुद्र स्वार्थासाठी असंबद्ध, चुकीची आणि अतिरंजित माहिती प्रसारित करणाऱ्या दर्जाहीन, विवेकशून्य, आक्रस्ताळ्या हिंदी वाहिन्या आणि त्या आवडीने पाहणाऱ्या प्रेक्षकांना अनादरपूर्वक समर्पित.