Thursday, July 14, 2005

ग्रीष्म सहल आणि छायाचित्रे !

"इथे ऊनही पडते तर?" माझा खरे तर विश्वासच बसत नव्हता. यापूर्वी दोन दोन आठवडे सूर्य न पाहता काढले होते. थर्मामीटर तर मी बघायचाच सोडून दिला होता. काय फरक पडतो आज मायनस १० आहे का २०? रोज आपले अंधारात बर्फ तुडवत ऑफिसला जायचे आणि अंधारात परत.

दिसलाच जर चुकून सूर्य कधी, तर खूप बरे वाटायचे. आपल्या आयुष्यात सूर्याला इतके महत्त्व आहे, हे माहीत होते, पण कधी जाणवले नव्हते.

असो, तो उदास आणि निराशावादी काळ आता सरला होता आणि उत्साही वसंत ऋतूला सुरुवात झाली होती. पावसांच्या सरी शांतपणे आपले अस्तित्व दाखवून गेल्या. जनजीवन विस्कळीत वगैरे करणारा पाऊस नव्हताच. निष्पर्ण झाडांवर आता थोडी थोडी पालवी दिसू लागली होती.

हळुहळू उन्हाळ्याची चाहूल लागत होती. काही दिवसांपूर्वी आठपर्यंत उगवण्याचे नाव न घेणारा सूर्य सहाच्या आधीच हजेरी लावू लागला आणि संध्याकाळी सात-आठ वाजले तरी रेंगाळू लागला. आणि "मिड समर" येई पर्यंत तर, अंधार काय असतो हे विसरल्यासारखे वाटू लागले होते, कारण पूर्ण अंधार पडायचाच नाही. झाडेही पूर्ण हिरवीगार झाली होती.

उन्हाळा सुरू झाला, तसे इथल्या लोकांच्या कपड्यांची लांबी आणि रूंदी कमी होऊ लागली :) ऑफिसमध्येही लोक अर्ध्या चड्ड्या (बरमुडा) आणि अर्ध्या बाहिचा अंगरखा (हाल्फ स्लीव्ह शर्ट :)) घालून येऊ लागले. ऑफिस बाहेर तर विचारू नका. आणि जर समुद्रकिनारी वगैरे गेलात तर.... असो, तो आत्ताच्या लेखाचा विषय नाही ;)

एकूण काय सूर्याच्या उन्हामुळे डोक्याचा आणि (कमी कपड्यांतील) तरुणींना पाहून डोळ्यांचा ताप वाढला होता. :)

आम्हीही ठरवले, "आपणही सेलेब्रेट करू 'मिड समर'!" बऱ्याच विचारमंथनानंतर ठरले की ऑस्लोला जायचे. ऍल्महल्टहून बसने हेल्सिनबोर्ग आणि तेथून "लक्झरी क्रूझ"ने ऑस्लो. छानच झाली ती ट्रिप. आम्ही सर्वांनी (एकूण साडेदहा लोकांची टिम ;) हो एक लिंबुटिंबू खेळाडूही होता, त्याचा फोटो आहेच पुढे)

काही छायाचित्रे इथे देत आहे,

हेल्सिनबोर्गचा दूर होणारा किनारा ...

काय पिऊ आणि काय नको? आमच्या टीममधला सर्वात लहान खेळाडू :) ...

रात्रीचे अकरा वाजले तरी सूर्य मावळायचे नाव घेत नाही ...

समुद्राचे सुंदर दृष्य ...

समुद्राकाठची घरे ...

ऑस्लो चा राजवाडा ...

हिरवळ ...

स्कल्पचर्स पार्क ...

~शशांक