Saturday, August 20, 2005

Stockholm

गेल्या आठवड्यात स्टॉकहोमची सहल आयोजित केली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता निघायचे ठरले. नेहमीप्रमाणे ठरल्या वेळेच्या थोड्या उशीर म्हणजे पावणेसात वाजता प्रवास सुरू झाला. आमच्या गावापासून स्टॉकहोम जवळपास पावणेपाचशे किलोमीटर आहे. सूर्य मावळेपर्यंत जेवढे अंतर जाता येईल तितके जावे असा विचार करून आमच्या दोन्ही गाड्या सुसाट (१२०-१८० किमी/तास) वेगाने निघाल्या.

उन्हाळा संपत चालल्याने लवकर, म्हणजे 'संध्याकाळी' ९ वाजताच्या सुमारास अंधार पडू लागला. भूकही लागली होतीच. आम्ही रस्त्याकडेच्या एका मॅकडोनाल्डच्या धाब्यावर थांबलो. भारतात रात्री जेवायला गाडी थांबली की सरदारजीला "सत् श्री अकाल" करून चना मसाला आणि तंदुरी रोटी चापता यायची. त्याआठवणीने अगदी भरून आले. असो, मॅक्डी मधली "वडापावाची भ्रष्ट नक्कल" म्हणजे बर्गर मला तरी नको होता (बऱ्याचदा मॅक्डी मध्ये शाकाहारी वडापाव मिळत नाही, "बर्गर किंग" हुडकावे लागते) श्रावण चालू असल्याने मांसाहारी लोकांची पण अडचण होती. त्यामुळे आमच्या संघातील महिला खेळाडूंनी आपल्या दुपारच्या झोपेचा त्याग करून बनवलेले घरगुती जेवण आम्ही आणले होते. "व्हेज कोल्हापुरी आणि पाव" असा बेत होता. सोबतीला "हिंदी चीनी भोजनभाऊ" असा 'व्हेज फ्राइड राईस' होता आणि गोडासाठी शेवयांची खीर असे भरपेट जेवण झाले. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.

रात्री १२ वाजता स्टॉकहोममध्ये पोचलो. शुक्रवारची रात्र असल्याने सगळे रस्ते तरुण-तरुणींनी भरून वाहत होते. तो "माहौल" बघून मला ऍमस्टरडॅमची आठवण झाली. दहा लोकांची राहण्याची व्यवस्था तीन निरनिराळ्या ठिकाणी होती. इथे राहणारे लोक आपल्या घरातल्या काही खोल्या एक-दोन दिवस भाड्याने देतात. त्याला "ब्रेड ऍन्ड ब्रेकफास्ट" म्हटले जाते. स्टॉकहोम शहर म्हणजे एक भुलभुलैयाच होता. त्या गल्लीबोळातून फिरत फिरत, विवाहित लोकांना त्यांच्या ठिकाणी सोडून "यूथ हॉस्टेल" ला पोहोचेपर्यंत पहाटेचे चार वाजले! चार वाजेपर्यंतही आम्ही रस्ता चुकल्यावर विचारण्यासाठी तरुण-तरुणींची टोळकी भेटत होती.

दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन, गाडी घेऊन न फिरता उघड्या टपाच्या "स्टॉकहोम दर्शन" बसने फिरायचे ठरले. ही बस सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देते. तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही उतरू शकता आणि थोड्या वेळाने दुसऱ्या बस मध्ये पुन्हा चढू शकता. त्याला "हॉप ऑन, हॉप ऑफ" म्हणतात. स्टॉकहोम हे समूद्रकिनारी वसलेले आहे शिवाय आजूबाजूला बरीच बेटे पण आहेत त्यामुळे "हॉप ऑन, हॉप ऑफ" बोटींचे ही आम्ही तिकीट घेतले.

प्रवास अगदी नयनरम्य होता. मध्ये एका ठिकाणी एका बाजूला एक प्रचंड मोठे तळे आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ जमीन असा रस्ता लागला.आमचे यूथ हॉस्टेलसकाळी सकाळी यूथ हॉस्टेलच्या बाहेरचे दृश्यघोडेस्वारांसाठी खासस्टॉकहोमची कोस्टल लाइनशहरमध्यातली एक जागानाट्यगृहनॉर्डिक म्युझियम, स्वीडनविषयी ऐतिहासिक, सामाजिक आणि कलाविषयक माहिती इथे आहे. (वेगवेगळ्या कोनांतून)"स्कॅन्सेन". इथे १७व्या, १८व्या शतकातील स्वीडन उभे केले आहे. जुनी घरे, दुकाने, छापखाने. जणू एक त्याकाळातले खेडेच. त्यातील एक दुकान."वासा म्युझियम", इथल्या लोकांनी बऱ्याच वर्षांपूर्वी बरेच पैसे खर्च करून एक महाकाय नाव बनवली होती. आपल्या पहिल्याच प्रवासात तांत्रिकदोषांमुळे ती बुडाली. बरीच वर्षे पाण्याखाली होती. तिला बाहेर काढून तिचे संग्रहालयात रुपांतर केले आहे.गजबजलेला रस्ता. अशी उपाहारगृहे पाहून मला पॅरिसच्या सुप्रसिद्ध "शाँज एलिसे" रस्त्याची आठवण झाली.


स्टॉकहोमचा राजवाडापरतीच्या प्रवासात इंद्रधनुष्य दिसले.