Sunday, January 29, 2006

रिलेशनशिप्स

मागे एका फॉरवर्ड मेल मध्ये सर्व राशींच्या लोकांचे स्वभाववैशिष्ट्य कसे असते याची माहिती आली होती. ती माहिती सौरराशींवर आधारित होती. मी थेट मझ्या राशीची माहिती वाचायला लागलो. (माझा जन्मदिवस १५ ऑक्टोबर. आणि हो! त्यादिवशी मी भेटी स्वीकारतो. "भेटी" या शब्दाचे "मीटिंग" आणि "गिफ्ट्स" हे दोन्ही अर्थ अपेक्षित आहेत. :)) तर, माझ्या राशीविषयी, इतर माहितीबरोबरच "confusing relationships" असे लिहिले होते. विचाराअंती ते काही प्रमाणात खरे आहे असे वाटले. पण कन्फ्युजन हे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असतेच.

प्रत्येकाची विचारशक्ती वेगवेगळी असते. Some people are not intelligent enough to understand the confusion! (हे माझेच वाक्य आहे) मला वाटते "कन्फ्युजन आहे" हे समजण्यासाठी सुद्धा एक वैचारिक पात्रता लागते. माझ्या इंग्रजी ब्लॉगमधील एका पोस्ट मध्ये मी स्वत:बद्दल (म्हणजे माझ्या त्यावेळच्या अवस्थेबद्दल) लिहिताना म्हटले होते, "I'm not sure ... either I'm not confused at all or I'm too confused to understand I'm confused."

कोणाला काय अपेक्षित असते याविषयी काही सर्वसामान्य मान्यता आहेत, (आणि इतर सर्व "सर्वसामान्य मान्यतां"प्रमाणेच वास्तवापासून दूर आहेत ;)) पण या सर्वसामान्य सिद्धांताचे काही दुष्परिणाम आहेत का? नक्कीच. "आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न" हा या "सर्वमान्य सिद्धांतां"चा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे.

पण ही दिखाऊगिरी लगेच ओळखू येते, थोडाफार स्मार्टनेस असणाऱ्यांना ही दिखाऊगिरी लगेच समजेल. पण आधी म्हटल्या प्रमाणे Some people are not intelligent enough .... majority of them.

.

Thursday, January 26, 2006

एक स्वीडीश संध्याकाळ!

शीर्षक वाचून वाटेल की संध्याकाळ मी एका सोनेरी केसांच्या, गोऱ्यापान (भयंकर थंडीमुळे जराशी लालसर/गुलाबी छटा आलेल्या) एका सुंदर कन्येबरोबर घालवली की काय? नाही हो! तेवढे आमचे नशीब (अजून तरी) नाही ;) तर... त्याचे झाले असे की मी पडलो शाकाहारी प्राणी. तसे इथेही वेजिटेरिअन्स आणि फ्रुटेरिअन्स आहेत (फ्रुटेरिअन वरून Notting Hill मध्ये Hugh Grant ला 'दाखवायला आणलेली' फ्रुटेरिअन बया आठवली ;)) पण एकूणच माझ्या सहकाऱ्यांना शाकाहारी लोकांबद्दल कुतूहल आहे.

त्यातल्या एकाने एका संध्याकाळी मला जेवायला बोलावले. ऑफिसातून निघून थेट त्याच्या घरी धडकलो. त्याचे घर म्हणजे एक अजबखानाच आहे. गेल्यागेल्या कॉरीडॉरमध्ये एक भिंतभर उभे शोकेससारखे काही दिसले ('रॅक्स'... ज्यांनी डेटासेंटर्स मधल्या सर्वररूम्स पाहिल्या आहेत त्यांच्यासाठी) त्यात काही मोठे आणि आणि बरेच मध्यम आकाराचे संगणक (बटाटे नव्हे, "मध्यम आकाराचे" वगैरे अशी ओळख कांदेबटाट्याची देतात ;)), मॉनिटर्स. १, २ घडीचे संगणक (लॅपटॉप्स) आणि इतर बरेच हार्डवेअर पसरलेले होते. ते पार करून हॉल मध्ये गेलो. हॉल तसा प्रशस्त आणि टापटिप होता.

हा गडी खानसाम्याच्या वेषात, म्हणजे पोटाला कापड गुंडाळूनच होता. मी थेट त्याच्याबरोबर स्वयंपाकघरात शिरलो.
"शुड आय हेल्प यू इन समथिन?" मी विचारले.
"नो..न..न..न...न..नो यू आ माय गेस्ट टुडे!" असे तो मान हलवत आणि डोळे मोठे करत म्हणाला.
"ओके". मग मी त्याची पाककला पाहात, लागलेली आंग्ल गाणी ऐकत उभा राहिलो.
"वेट अ मिनिट! आय हॅव समथिंग फॉर यू!" असे म्हणून हॉलमध्ये गेला आणि "बुद्धा बार"ची चकती लावून आला.
"आय होप यू लाईक इट?"
"येआह! वेरी मच!" मी. खरंतर त्यातली बरीच मी ऐकलेली नव्हती.
"वॉट आ यू प्लॅनिंग टू प्रिपेर?" मी
"कूसकूस!" तो.

कूसकूस त्यावर ती भाज्यांची, क्रीम आणि मस्टर्डयुक्त ग्रेवी, पाव, बटर आणि संत्र्याचा रस..... छान जेवण झाले. जेवण झाल्यावर त्याने एक वेगळ्याच प्रकारचे चीज़ फ्रीज़मधून बाहेर काढले. त्यावर गडद काळसर हिरव्या रंगाचे डाग होते.
"कॅन यू गेस वॉट इज़ दिस?"
मला ते बुरशीसारखे वाटले "इट लुक्स लाइक सम काइंड ऑफ लिव्ज़"
"हाहाहा ... नो, इट्स फंगस!"
"फंगस?"
"येस, बिकॉज़ ऑफ फंगस इट टेस्ट्स डिफरंट, वी लाइक इट"
"ओह्ह!"
त्याने तोपर्यंत पारले मोनॅकोसारखी बिस्किटे काढली आणि त्यावर या चीज़चा एक स्लाईस ठेऊन माझ्या हातात दिला. चव आणि वास सुरुवातीला विचित्र वाटले खरे पण नंतर मजा वाटली.
"वुड यू लाइक टू हॅव अ कप ऑफ फ्रेश कॉफी?" तो
"येस, शुअर" मी
त्याच्या घरी एक कॉफी बनवायचे पारंपरिक यंत्र होते. त्याने कॉफीच्या बिया दळून त्यापासून दोन कप मस्त फेसाळलेली कॅफे लाट्टे तयार केली. कॉफी पिऊन हॉलमध्ये बसतोय तोवर हा पुन्हा स्वैपाकघरात पळाला. आता हा काय आणतो बरे असा विचार करत मी आपला त्याच्या सोफ्यावर आरामात हात पाय ताणून बसलो. थोड्या वेळाने साहेब पॉपकॉर्नने भरलेली छोटी बुट्टी आणि मगासचे चीज़ आणि बिस्किटे घेऊन आले.
"मूवी टाइम!!!" समोरच्या कपाटातून डिवीडी/सीडीजचा अल्बम काढून माझ्या हातात देत तो म्हणाला. " टेक आऊट वॉटेवर यू लाइक"
मी न पाहिलेला कोणता चित्रपट दिसतो ते पाहू लागलो. "कॉन्स्टंटाइन" दिसला, मी पाहिला नव्हता. नंतर पॉपकॉर्न आणि बिस्कीटे खात तो भुताखेतांचा चित्रपट पाहून रात्री जड अंत:करणाने आणि जड पोटाने त्याला "धन्यवाद" म्हणून निरोप घेतला.
.

Wednesday, January 25, 2006

कालचा दिवस

कालपरवा -१८ ते -२० अंश सेल्सियसमध्ये रेंगाळणारे तापमान आज बरेच सुसह्य झालेय. काल सकाळी ८ च्या सुमारास घरातून निघून कार्यालयात पोहोचलो. मानेच्या वरील देहाचा भाग झाकलेला नसल्याने माझ्याच चेहऱ्याला हात लावला तरी कुणा दुसऱ्याच्या चेहऱ्याला स्पर्श केल्यासारखे वाटत होते ;) म्हणजे तसे काही नाही, स्पर्श झालेला हाताला जाणवत होता पण चेहऱ्याला जाणवत नव्हता.


तसे काल दिवसभर "Outside office hours" करायच्या एका महत्त्वाच्या कामशिवाय इतर नेहमीचेच होते. बरोबर ५ वाजता ती OOH चाचणी सुरू केली. कोणतेही महत्त्वाचे काम करताना सगळ्या गोष्टी मर्फीच्या नियमांनुसार वागतात याचा पुषकळदा अनुभव आलेला आहे. (मर्फीच्या नियमांवर माझी नितांत श्रद्धा आहे ) त्यामुळे शक्य तितकी पूर्वतयारी करूनही आणि विचारपूर्वक पावले उचलूनही आलेले अनाकलनीय आणि अगम्य अडथळे पार करत कसेबसे दिलेल्या खिडकीत (सर्विस विंडो) काम झाले. "संगणकही लहरी असतो आणि नेमक्या हातघाईच्या प्रसंगात आपली गोची करतो" असे वाटते मला कधीकधी. तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का?


रात्री टीव्हीवर मि. डीड्स लागला होता. कहाणी तशी घिसिपिटी (हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीकडे) असली तरी पाहून मजा आली. डीड्स एका छोट्या शहरात पिझ्झेरिया चालवणारा आणि अधेमधे कविता करणारा एक साधा आणि सहृदयी माणूस. त्याला अचानक एका दिवंगत अंकलची ४० बिलियन डॉलरची मालमत्ता मिळते. तो मोठ्या शहरात येतो. बरेच संधीसाधू भेटतात. एक पत्रकार 'स्टोरी' मिळवण्यासाठी त्याच्या जवळ येते, पुढे (साहजिकच) त्याच्या प्रेमात पडते. पण तोपर्यंत त्याला नको ते कळाल्याने सगळी संपत्ती टाकून तो दूर जातो. शेवटी गैरसमज दूर, दुष्टांचा पराभव आणि शेवटी कथानायकाचा "पैसा म्हणजे सर्वस्व नाही. जास्त पैसा मिळवण्याच्या नादी न लागता, तुम्हाला जे करावे असे वाटते ते करा" असा संदेश असा अगदी टिपिकल मसाला होता. माझी आवडती Winona Ryder असल्याने असेल कदाचित पण बरा टाइमपास झाला. Adam Sandler चा भाबडा अभिनय कथेला साजेसा.


(चित्रांवर टिचकी मारल्यास मोठी चित्रे दिसतील.)

.

Friday, January 20, 2006

विंडोज़ मध्ये देवनागरी

विंडोज़ मध्ये देवनागरी

बराहा बरोबर येणारे "बराहा डायरेक्ट" नावाचे एक हत्यार वापरून कुटेही देवनागरी लिहिण्याची सोय आहे.

पायऱ्या अश्या
  1. बराहा इन्स्टॉल केल्यावर, बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
  2. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
  3. F12 कळ दाबली असता खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
  4. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
  5. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
  6. F11 कळ दाबल्याने होईल इंग्लिश-मराठी उड्या मारता येतील
  7. खाली दिलेले चित्र पाहा.


  8. माझ्याकडील विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नाही त्यामुळे नोटपॅड मध्ये जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.

चला तर मग. वापरा आणि कळवा.

आपला,
(प्रयोगशील) शशांक


लिनक्स मध्ये देवनागरी? शून्य - एक संगणकीय कविता पाहा :)

.

Thursday, January 19, 2006

स्वामी विवेकानंदविवेकानंदाचे चरित्र आणि विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.

भारतभूमीच्या या सुपुत्राचे स्मरण व्हावे म्हणून काही दुवे देत आहे.


भारतमातेच्या या थोर सुपुत्राला सादर प्रणाम!

.

Monday, January 16, 2006

नवा ब्लॉग !

मित्रहो,

समग्र शशांक जोशी असा एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आजपर्यंत मराठीतून जे काही लिहिले ते एका ठिकाणी जमवण्याचा उद्देश आहे.

का? कशासाठी? नाव असे का निवडले? हेच नाव का निवडले? तुम्ही स्वत:ला कोण समजता?

खरे सांगू? या प्रश्नांची उत्तरे मलाही अजून माहीत नाहीत. कळाली की इथे लिहिनच.

आपल्या अभिप्रायांची अपेक्षा.